Saturday, March 28, 2009

आर्थिक मंदी आणि निवडणुका

कामगार मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ऑक्टोबर ते डिसेम्बर या काळात भारतातील सुमारे ५ लाख लोकांना आपल्या नोक-या गमवाव्या लागल्या. आणि हा आकडा फक्त संघटित क्षेत्रातील नोक-यांचा आहे - ज्याचे प्रमाण एकूण उद्योगांच्या फक्त १०% आहे. त्यामुळे एकूण किती जणांच्या नोक-या आर्थिक मंदीमुळे गेल्या असाव्या याचा अंदाज करताना या आकड्याला सरळ १० ने गुणायला हरकत नाही. म्हणजे ५० लाख लोक त्या ३ महिन्यात बेकार झाले. त्या नंतरच्या काळात त्याहून कितीतरी अधिक लोकांच्या नोक-या गेल्याचे अनुमान आहे.

जागतिक आर्थिक मंदी भारता पर्यंत अजून पोचते तर ही अवस्था! आणखी पुढे काय होणार आहे माहीत नाही. पण आपण सगळे शांत आहोत. म्हणजे नोकरी जाण्याचं भय आहेच, पण आपण परिस्थिती स्वीकारलेली आहे. म्हणून तर सगळ्या दुनियेत हे संकट ओढवून घेणा-या आर्थिक धोरणांना प्रचंड विरोध, निदर्शने होत असताना आपल्याकडे अगदी सामसूम आहे. सुनामी किंवा भूकंप अशी नैसर्गिक संकटे असतात तसंच हेही एक संकट अशी आपण मनाची समजूत घातलेली आहे. "आता सगळ्या जगाताच आलीये मंदी तशीच इथेही! त्याला कोण काय करणार? आख्खी अमेरिका भुई सपाट केली तिने, तिथे आपला काय पाड!" असा विचार करून आपण हे संकट डोळ्या आड़ करू पहातो आहोत.

सगळं काही बाजारावर सोडून देणा-या 'उदार' आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे आणि ही धोरणे राबवणारे सत्ताधारी या आपल्या अवस्थेला कारणीभूत आहेत, असं आपल्याला वाटतच नाही! मग या धोरणांच्या विरोधात आपण आवाज उठवणं ही तर फार पुढची गोष्ट झाली.

निवडणुका जाहीर झाल्यात, सगळे पक्ष आपापले मुद्दे घेऊन लोकांसमोर मतांसाठी झोळी घेऊन हजर झाले आहेत. पण कोणाच्याही अजेंड्यावर आर्थिक मंदीला तोंड कसं देणार हा प्रश्नच नाही! काँग्रेसच्या दृष्टीने तर भारतात आर्थिक मंदीच नाहीये. ते म्हणे विकास दर तेवढाच राखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अरे, जरा विचार करून बोला! जरा तरी गंभीरपणे बघा! भाजपचा आणि आर्थिक प्रश्नांचा कधी काही संबंध नसतोच, त्यामुळे त्यांना सोडूनच देऊ. राहिता राहिले तथाकथित पुरोगामी आणि डावे पक्ष! त्यांनी जाहीर केलंय की त्यांच्या विरोधामुळेच भारतात मंदी आटोक्यात आहे, त्यामुळे असाच विरोध करण्या साठी त्यांना निवडून दया! का? विरोध करायला तिथे संसदेतच जावं लागतं?

अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की देशापुढच्या सर्वात गंभीर प्रश्नाचा आणि निवडणुकांचा काहीही संबंध राहिलेला नाही. जागा वाटप कसं होतंय, कोण कुठून उभे राहणार, या वेळी कुणाचा पत्ता कट होणार, कुणाच्या युत्या, कुणाची फूट याची चर्चा करण्यात प्रसार माध्यमं गुंग आहोत. कुणीही निवडून आलं तरी आपल्या आयुष्याचं जे वाटोळं व्हायचं ते होणारच आहे हे इथल्या प्रत्येकालाच माहीत आहे. अशा वेळी फक्त प्रत्येकाने मत दिले पाहिजे अशा मोहिमा काढण्यात काही अर्थ आहे?
1 comment:

a Sane man said...

"जागतिक आर्थिक मंदी भारता पर्यंत अजून पोचते तर ही अवस्था! आणखी पुढे काय होणार आहे माहीत नाही. पण आपण सगळे शांत आहोत. म्हणजे नोकरी जाण्याचं भय आहेच, पण आपण परिस्थिती स्वीकारलेली आहे. म्हणून तर सगळ्या दुनियेत हे संकट ओढवून घेणा-या आर्थिक धोरणांना प्रचंड विरोध, निदर्शने होत असताना आपल्याकडे अगदी सामसूम आहे. सुनामी किंवा भूकंप अशी नैसर्गिक संकटे असतात तसंच हेही एक संकट अशी आपण मनाची समजूत घातलेली आहे. "आता सगळ्या जगाताच आलीये मंदी तशीच इथेही! त्याला कोण काय करणार? आख्खी अमेरिका भुई सपाट केली तिने, तिथे आपला काय पाड!" असा विचार करून आपण हे संकट डोळ्या आड़ करू पहातो आहोत.

सगळं काही बाजारावर सोडून देणा-या 'उदार' आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे आणि ही धोरणे राबवणारे सत्ताधारी या आपल्या अवस्थेला कारणीभूत आहेत, असं आपल्याला वाटतच नाही! मग या धोरणांच्या विरोधात आपण आवाज उठवणं ही तर फार पुढची गोष्ट झाली."

अगदी! हे अस्संच वाटतंय मला...दुष्काळ पडलाय अशा आविर्भावात सगळे अगदी निमूट बसलेत, मंदी आहे असं म्हणत...प्रचंड चिडचिड होतेय!