Tuesday, December 23, 2008

मेणबत्त्या, फुलं वगैरे

गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी दहशतवाद विरोधी मोर्चे आणि सभांचे आयोजन होत असल्याच्या बातम्या वाचल्या. दहशत वादाच्या विरोधात एक भावनिक उद्रेकच सगळीकडे उसळलेला दिसतो आहे.
चांगली गोष्ट आहे. कुठल्या तरी सामाजिक गोष्टीसाठी लोक एकत्र येत आहेत हे चांगलंच आहे. पण काही प्रश्न उभे राहिलेत हे वाचताना!
का बरं हे सामाजिक भान आपल्याला या घटने नंतरच आलंय? आपल्याला नक्की कशाचा राग येतोय? कशाचं वाईट वाटतंय? निरपराध लोकांना असा आपला जीव गमवावा लागतो याचा? पण आपल्या देशात दीड लाख निरपराध शेतक-यांना गेल्या १० वर्षात आत्महत्या कराव्या लागल्या, त्याबद्दल नाही आपल्याला इतका संताप आला?
सामाजिक सुरक्षाव्यवस्थे मध्ये असणा-या त्रुटी आपल्याला अस्वस्थ करत आहेत, पण खरंच का आपण सामाजिक सुरक्षेबद्दल तितके जागरूक आहोत? तसं असेल तर देशभरात मोठ्या प्रमाणात जे अपघात होतात, त्याबद्दल का नाही आपण एकत्र येऊन काही करत? मुंबई मध्ये मागच्या वर्षी ट्रेन मधून पडून ८२४ लोकांना आपला जीव गमवावा लागला, पण अशा अपघातांना आपण सहज विसरून जातो. असं का?
हे तर झालं अपघातांचं, तितक्याच मोठ्या प्रमाणात होणा-या हत्यांचं काय? आपल्याच देशात रोज ६ स्त्रियांना हुंड्यासाठी आपला जीव गमवावा लागतो, त्याबद्दल आपण का असेच पेटून उठत नाही? आणि गर्भातच मारले जाणारे असंख्य स्त्री भ्रूण? सवर्णांकडून केल्या जाणा-या दलितांच्या ह्त्या? या सगळ्यामध्येही निरपराध मारले जात आहेत ना? त्याबद्दल आपण का संवेदनशील नाही?
आणि सभा, निदर्शने, मोर्चे याच्या पुढे काय? मेणबत्त्या लावणे, मानवी साखळी, फुले वहाणे हे प्रतीकात्मक कार्यक्रम केल्याने आपल्याला बरे वाटते, पण त्याने परिस्थितीत फरक काहीच पडत नाही. त्यामुळेच या अशा कार्यक्रमाच्या बातम्या वाचताना बरं वाटतं, आणि वाईटही वाटतं.

5 comments:

a Sane man said...

ही प्रतिक्रिया तुमचा आधीचा लेख व हा लेख ह्या दोन लेखांसाठी आहे. फार संयतपणे अनेक गंभीर प्रश्न आपण उपस्थित केले आहेत. एकंदरीत सर्वांची विशेषतः माध्यमांची प्रतिक्रिया, विचारांची झेप भारत‍-पाक संबंध, युद्ध, अद्यावत सुरक्षाव्यवस्था, लोकशाही राजकीय प्रक्रियांना एकजात विरोध, जनतेतील असंतोषाला वाट करून देऊन समस्यांच्या मूळाकडे लक्ष वेधण्याऐवजी त्या रागाचं वाजवीबाहेर उदात्तीकरण एवढ्यावर मर्यादित राहिली आहे. हा बहुदा दहशतवादाच्या व दहशतवादीविरोधाच्या (दहशतवादविरोधाच्या नव्हे) जागतिकीकरणाचा परिणाम म्हणायचा का? हे प्रश्न तसेच अनुत्तरीत राहिले आहेत. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय! काय करूयात ह्यासाठी?

Anagha said...

Sane Man, तुमच्या प्रतिक्रिये बद्दल खूप आभार. तुमचा 'काय करुयात' हा प्रश्न खरंच विशेष आहे. आपण काही तरी करायला हवं ही भावना, आणि काही तरी करू शकतो हा विश्वास या दोन्ही गोष्टी जरा अभावानेच पहायला मिळतात.
काय करुयात हा खरंच मोठा प्रश्न आहे. पण जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे या बद्दल बोलत रहाणे, प्रश्न करत रहाणे हे तर आपण व्यक्तिगत पातळीवर करू शकतोच. आत्ता तरी आजूबाजूच्या गदारोळात मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधत रहाणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
पुन्हा एकदा आभार!

Anagha said...

Sane Man, तुमच्या प्रतिक्रिये बद्दल खूप आभार. तुमचा 'काय करुयात' हा प्रश्न खरंच विशेष आहे. आपण काही तरी करायला हवं ही भावना, आणि काही तरी करू शकतो हा विश्वास या दोन्ही गोष्टी जरा अभावानेच पहायला मिळतात.
काय करुयात हा खरंच मोठा प्रश्न आहे. पण जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे या बद्दल बोलत रहाणे, प्रश्न करत रहाणे हे तर आपण व्यक्तिगत पातळीवर करू शकतोच. आत्ता तरी आजूबाजूच्या गदारोळात मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधत रहाणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
पुन्हा एकदा आभार!

a Sane man said...

हो ते झालंच....पण त्यानं काय होईल कळत नाही. कुणालाच कसलंच काही पडलं नाहीये असा एकंदर माहौल आहे. बघूयात काही सुचतं, जमतं का!

fpandgrp said...

Kay karuyat ha prashnacha uttar aatta khup vague hoil. tyapeksha concrete target ka nahi thevat? e.g. pratham pak cha dahashatvadacha saport modun kadha. dahashatvadala janmala ghalnari vyavastha modayla suruwat hoil.