Saturday, August 27, 2011

भ्रष्टाचार विरोधी आंदोलन

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने संपूर्ण देशभरात जोर पकडलेला दिसतो आहे. वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांमध्ये बातम्या, चर्चा, उलटसुलट मतांचा गदारोळ चालू आहे. ज्यांना भ्रष्टाचार हा देशातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो, त्यांच्यामध्ये या आंदोलनाने जोश संचारला आहे.

क्वचितच रस्त्यावर दिसणारा मध्यमवर्गीय तरुण वर्ग रस्त्यावर आलेला पाहून खरंच चांगलं वाटतंय. एरवी स्वतःचे करियर आणि मौजमस्ती यांच्यात दंग असणारे सुद्धा काही करण्याच्या इच्छेने आंदोलनाला साथ देत आहेत हे दृश्य खरोखरच आशा जागवणारे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाचाराची जी अतिशय लाजिरवाणी प्रकरणे समोर आली, त्यामुळे लोकांच्या मनात खदखदणारा उद्रेक अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने बाहेर पडला आहे.

पण आंदोलनाच्या निमित्ताने खूपसे प्रश्नही समोर आले आहेत आणि मला वाटतं, रस्त्यावर येणे, मिरवणुका, घोषणा, टोप्या घालणे, झेंडे फडकवणे, या सगळ्या प्रेरक पण तरीही दिखाऊ गोष्टींच्या पलिकडे जाऊन या प्रश्नांचा शोध आता या आंदोलनात उतरलेल्या सर्वसामान्य तरुणांनी घ्यायला हवा आहे.

पहिला प्रश्न असा, की भ्रष्टाचार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे का आपल्या देशातला? समजा, भ्रष्टाचार अगदी पूर्णपणे संपला तर देश सुजलाम सुफलाम होईल? महागाई संपेल? अधिक नोकऱ्या मिळू लागतील? शिक्षणाचं बाजारीकरण थांबेल? शेतीतून बाहेर फेकल्या जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल?

आज देशात अत्यंत कायदेशीर पद्धतीने, संसदेमध्ये ठराव पास करून, कॉर्पोरेट्स आणि सरकार संगनमताने या देशातल्या शोषित जनतेला देशोधडी लावत आहेत. लौकिकार्थानं त्याला भ्रष्टाचार असं नावही देता येत नाही. त्याचं काय करायचं? इथल्या गरीब, शोषित जनतेच्या दृष्टीने लौकिक भ्रष्टाचार हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न नाहीये. त्यांची शेती ज्यामुळे तोट्यात जाते, विविध प्रकल्पांच्या नावाखाली त्यांच्याकडून हिसकावली जाते, त्यांची संसाधनं त्यांच्याकडून हिरावून मोठ्या कॉर्पोरेट्सना कवडीमोलानं विकली जातात, आणि हे सगळं अगदी कायदेशीर पद्धतीनं होतं आहे, तो खरा खूप मोठा प्रश्न नाही का?

आणि आता आंदोलनाविषयी -
जनलोकपाल बिल काय आहे आणि त्यातून काय साध्य होणार आहे हा तर फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यावर खरोखरच समाजातल्या सर्व स्तरांमधून चर्चा, वाद-प्रतिवाद होण्याची गरज आहे. केवळ अण्णा उपोषण करत आहेत म्हणून घाईघाईने त्यांनी दिलेला मसुदा पास करणे असे करणे योग्य आहे का? तशी मागणी करणे तरी योग्य आहे का?

या आंदोलनाचं एक यश तर आहेच. एका कोषात राहणाऱ्या अनेकांना या आंदोलनाने आपल्या आजूबाजूला पहायला भाग पाडलं हे सर्वात मोठं यश म्हणावं लागेल. पण आता त्यापुढे जाऊन, प्रश्न मुळापासून तपासण्याची गरज आहे. कदाचित खरा साप बाजूलाच राहून आपण भुईच धोपटत नाही ना याची शहानिशा करण्याची गरज आहे.





Monday, February 7, 2011

पुणे सांस्कृतिक - १

गेल्या काही दिवसांत काही नाटकं, काही अन्य कार्यक्रम अशा बऱ्याच गोष्टींना हजेरी लावली. त्यातील काही नक्कीच लक्षवेधक होते.

नाटकाचं नाव - स्वैरभैर

सुदर्शनच्या दीर्घांक महोत्सव (किंवा तत्सम) मध्ये या दीर्घांकाचा प्रयोग पाहिला. नाटकाच्या सुरुवातीलाच सुट्टीच्या दिवशी उठून करण्यासारखं काही नाही म्हणून झोपून राहिलेला एकजण आणि त्याला विचाराला प्रवृत्त करणारी एक विक्रेती यांच्या संभाषणातून माणसं कोणतीही गोष्ट का करायची याचा विचार न करताच आयुष्यभर गोष्टी कशा करत जातात इथपासून ते कोणतीही गोष्ट करायचं स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते स्वातंत्र्य माणसाकडे असतं का आणि असलं तर त्याची जाणीव असते का, ते स्वातंत्र्य उपभोगण्याचा विचार असतो का इ. प्रश्न समोर येतात.

त्यावेळी हे नाटक याच विषयावर असेल असं मला वाटलं होतं.
पण दुसऱ्या बाजूला पॅरलली, या प्रश्नांचं व्यवहारातलं रूप म्हणून की काय पण एका जोडप्याची एक कथा सुरू राहते..नोकरीच्या चक्रात (स्वखुशीने?) पिळून निघणाऱ्या एका जोडप्याची, गौरी आणि केशवची कथा..नोकरीचा चक्रव्यूह भेदता येत नाही, हा राक्षस दिवसाचा आणि रात्रीचाही सगळा वेळ खाऊन टाकतोय, आपल्याला आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करू देत नाही, या विचारानं ते, विशेषतः केशव अस्वस्थ झालाय, पण ते काय आहे ते त्याला नीटसं कळत नाहीये. एक जुनी मैत्रिण कॉलेजच्या दिवसांची आणि तेव्हा पॅशनने केलेल्या नाटकांची आठवण करून देते, तेव्हा त्याला अचानक प्रकाश दिसल्यासारखं वाटतं, आणि पुन्हा एकदा तो आपल्या त्या पॅशनकडे वळतो.

इकडे विक्रेत्या मुलीबरोबरच्या संभाषणातून काहीतरी करून पहायला पाहिजे म्हणून अनाथाश्रमात काम करू लागलेल्या तरुणालाही काहीतरी गवसल्यासारखं वाटतं. पण स्वातंत्र्य पाहिजे म्हणून अपेक्षा, जबाबदाऱ्यांचंही ओझं नाकारताना तो हे काहीतरी करणं पुन्हा गमावतो. पुन्हा एकदा त्याच विक्रेतीशी बोलताना हे त्याच्या लक्षात येतं.

मला काय आवडलं - मला नाटकाचा प्रामाणिकपणा, आणि उत्स्फूर्तता खूपच आवडली. एका ठराविक गटासाठीचंच हे नाटक आहे हे पहिल्या काही मिनिटातच लक्षात येतं. नाटकाकडून व्यापक सामाजिक भान असण्याच्या अपेक्षा न ठेवताच ते पाहिलं पाहिजे. तरच त्यातली तळमळ, आपले प्रश्न मांडण्याची धडपड लक्षात येईल. नाटक नेटकं आहे, गुंतवून ठेवतं. वाक्यं चटपटीत आणि तरीही काही विचार मांडणारी होती. मुख्य म्हणजे बघा आता आम्ही कसं नाटक करतो ते असं म्हणून केलेलं नव्हतं, तर ते काही सांगायची धडपड करणारं नाटक आहे हे मला खूपच आवडलं. त्यामुळेच ते कळलंही आणि त्यावर विचारही केला गेला.

काय नाही आवडलं - नाही आवडलं म्हणण्यापेक्षा काय मर्यादा होत्या असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. पूर्वी म्हटलं तसं नाटक एका अगदीच मर्यादित गटासाठी आहे. त्यांचे प्रश्न त्यांचे स्वतःचे म्हणून अगदी खरे आणि प्रामाणिक आहेत, पण तेही वरवरचे आहेत असं वाटलं. याच गटातल्या लोकांमध्ये असणारी स्पर्धा, असुरक्षितता, सातत्यानं चांगली कामगिरी करण्याचं प्रेशर हे प्रश्न तितकेसे जोरकसपणे पुढे येत नाहीत. (नोकरीत अप्रेजलमध्ये नायकाला सगळं छान छान, म्हणून प्रमोशनच ऑफर केलं जातं, हे जरा खटकतं. हे सर्वसामान्य नाही.)

बऱ्याच प्रश्नांना नाटक वरवर स्पर्श करतं, खोलात कशाच्याच जात नाही. त्यामुळेच जे सोल्यूशन मिळतं तेही वरवरचं वाटलं. ते खरंच व्यवहार्य सोल्यूशन आहे? आज अशा प्रकारच्या नोकऱ्यांतून भरपूर पैसा मिळतोय, त्यामुळे त्याच्या मोहापायी दिवसाचे २४ तास तिथेच घालवणाऱ्या लोकांची कमतरता नाही. स्पर्धा जीवघेणी होते आहे. व्यक्तिगत आयुष्याच्या अधिकाधिक त्यागाची अपेक्षा केली जाते आहे. त्यामुळे नवरा बायकोच्याच नाही तर मित्रा-मित्रांच्या, भावाबहिणींच्या पालक-मुलांच्या नात्यामध्येही निखळपणा उरलेला नाही. अशा वेळी आजच्या या व्यवस्थेत अशा छंदांना कितपत जागा उरली आहे? एक नाटक करणं वेगळं, पण जर ती एक जीवनशैली म्हणून स्वीकारायचं ठरवलं, तर ते किती जणांना झेपेल? तेही मोठं घर, चांगलं फर्निचर वगैरे वगैरे स्वप्नं असताना? अशा प्रकारच्या गोष्टी करताना पुढे येणाऱ्या अपरिहार्य क्रायसिसचं काय? त्याची थोडीशी हिंट गौरीला नाटकामुळे केशव आपल्यापासून दूर जातोय असं वाटतं त्यातून दिली आहे, पण मग घाईघाईनं त्याच्यावरही तोडगा काढायचा प्रयत्न केला गेलाय. ते कशासाठी?