Saturday, August 27, 2011

भ्रष्टाचार विरोधी आंदोलन

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने संपूर्ण देशभरात जोर पकडलेला दिसतो आहे. वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्यांमध्ये बातम्या, चर्चा, उलटसुलट मतांचा गदारोळ चालू आहे. ज्यांना भ्रष्टाचार हा देशातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो, त्यांच्यामध्ये या आंदोलनाने जोश संचारला आहे.

क्वचितच रस्त्यावर दिसणारा मध्यमवर्गीय तरुण वर्ग रस्त्यावर आलेला पाहून खरंच चांगलं वाटतंय. एरवी स्वतःचे करियर आणि मौजमस्ती यांच्यात दंग असणारे सुद्धा काही करण्याच्या इच्छेने आंदोलनाला साथ देत आहेत हे दृश्य खरोखरच आशा जागवणारे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाचाराची जी अतिशय लाजिरवाणी प्रकरणे समोर आली, त्यामुळे लोकांच्या मनात खदखदणारा उद्रेक अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने बाहेर पडला आहे.

पण आंदोलनाच्या निमित्ताने खूपसे प्रश्नही समोर आले आहेत आणि मला वाटतं, रस्त्यावर येणे, मिरवणुका, घोषणा, टोप्या घालणे, झेंडे फडकवणे, या सगळ्या प्रेरक पण तरीही दिखाऊ गोष्टींच्या पलिकडे जाऊन या प्रश्नांचा शोध आता या आंदोलनात उतरलेल्या सर्वसामान्य तरुणांनी घ्यायला हवा आहे.

पहिला प्रश्न असा, की भ्रष्टाचार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे का आपल्या देशातला? समजा, भ्रष्टाचार अगदी पूर्णपणे संपला तर देश सुजलाम सुफलाम होईल? महागाई संपेल? अधिक नोकऱ्या मिळू लागतील? शिक्षणाचं बाजारीकरण थांबेल? शेतीतून बाहेर फेकल्या जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल?

आज देशात अत्यंत कायदेशीर पद्धतीने, संसदेमध्ये ठराव पास करून, कॉर्पोरेट्स आणि सरकार संगनमताने या देशातल्या शोषित जनतेला देशोधडी लावत आहेत. लौकिकार्थानं त्याला भ्रष्टाचार असं नावही देता येत नाही. त्याचं काय करायचं? इथल्या गरीब, शोषित जनतेच्या दृष्टीने लौकिक भ्रष्टाचार हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न नाहीये. त्यांची शेती ज्यामुळे तोट्यात जाते, विविध प्रकल्पांच्या नावाखाली त्यांच्याकडून हिसकावली जाते, त्यांची संसाधनं त्यांच्याकडून हिरावून मोठ्या कॉर्पोरेट्सना कवडीमोलानं विकली जातात, आणि हे सगळं अगदी कायदेशीर पद्धतीनं होतं आहे, तो खरा खूप मोठा प्रश्न नाही का?

आणि आता आंदोलनाविषयी -
जनलोकपाल बिल काय आहे आणि त्यातून काय साध्य होणार आहे हा तर फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यावर खरोखरच समाजातल्या सर्व स्तरांमधून चर्चा, वाद-प्रतिवाद होण्याची गरज आहे. केवळ अण्णा उपोषण करत आहेत म्हणून घाईघाईने त्यांनी दिलेला मसुदा पास करणे असे करणे योग्य आहे का? तशी मागणी करणे तरी योग्य आहे का?

या आंदोलनाचं एक यश तर आहेच. एका कोषात राहणाऱ्या अनेकांना या आंदोलनाने आपल्या आजूबाजूला पहायला भाग पाडलं हे सर्वात मोठं यश म्हणावं लागेल. पण आता त्यापुढे जाऊन, प्रश्न मुळापासून तपासण्याची गरज आहे. कदाचित खरा साप बाजूलाच राहून आपण भुईच धोपटत नाही ना याची शहानिशा करण्याची गरज आहे.

No comments: