Saturday, April 4, 2009

अभिव्यक्ति स्वातंत्र्य?

लोकसत्ता मधला हा लेख वाचला. आनंद यादव - वारकरी प्रकरणा बद्दलचा!
http://www।loksatta.com/daily/20090329/sun05.htm
विषय खरं तर जुना झालाय तरीही हा लेख वाचून त्यावर लिहावंसं वाटलं. लेखात खूप उद्वेगाने काही काही लिहिलंय. जरा विस्कळितच वाटतोय लेख. पण काही मुद्दे बरेच विचार करायला लावणारे आहेत.

या सगळ्याच प्रकरणाबद्दल मला काय वाटतं?
सर्वात पहिली गोष्ट ही की वारक-यांनी यादवांच्या पुस्तकाबद्दल आक्षेप घेणं यात मला चुकीचं काही वाटत नाही. किंवा असा आक्षेप घेणं हेच अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आणणारं आहे असंही वाटत नाही. उलट असे वाद-विवाद घडणं हे संस्कृतीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपल्याला जे चुकीचं वाटतं त्याबद्दल बोललंच पाहिजे. त्याबद्दल माफीचा आग्रह धरणं हे सुद्धा ठीकच आहे.
मात्र हे सगळं वाद-प्रतिवाद या स्वरूपात असेल तरच! सम्मेलन उधळून देणं, घरावर दगडफेक, तोंडाला काळं फासणं असली हिंसक कृत्यं करणं हे असंस्कृतपणाचं लक्षण झालं। विशेषत: यादवांनी ताबडतोब माफी मागितलेली असताना.
वारक-यांच्या संख्याबळाला घाबरून म्हणा किंवा संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मोह म्हणा, पण आनंद यादवांनी आपल्या लिखाणाबद्दल जराही प्रतिवाद न करता लगेचच शरणागती पत्करली. खरं तर पुस्तक लिहिणे आणि छापणे ही एक बराच काळ चालणारी प्रक्रिया असते, लेखक आणि प्रकाशक यांना आपण काय करतोय हे चांगलं माहीत असतं. त्यामुळे असं पुस्तक ताबडतोब मागे घेणं हे 'अविचाराने केलेल्या कृतीचा पश्चात्ताप' या सदरात नक्कीच टाकता येणार नाही. लेखकाला आपल्या पुस्तकाबद्दल काहीच आत्मीयता, निष्ठा कशी नाही? कविता महाजन म्हणतात तसं अभ्यास, चिंतन, वाचन, संशोधन, निरीक्षण, चर्चा, वाद-विवाद एवढं सगळं करून जर एखादं पुस्तक लिहिलं गेलं असेल, तर नक्कीच असायला हवी. सम्मेलनाचं अध्यक्षपद इतकं महत्त्वाचं वाटतं का? आणि शेवटी झालं काय? गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही!
तसं तर आनंद यादवांच्या त्या पुस्तकाबद्दल फारसं कुणाचं चांगलं मत नाहीये. ब-याच जणांना असं काही पुस्तक त्यांनी लिहिलंय हेही माहीत नव्हतं! पण तरीही पुस्तकाचा बरे-वाईट पणा बाजूला ठेवून साहित्य रसिकांनी वर्षातून एकदाच होणा-या संमेलनाला वेठीस धरायला विरोध करायला हवा होता. साहित्यिकांनीही अशा पद्धतीच्या दडपशाहीला विरोध करायला हवा होता, पण ते असो! साहित्यिकांच्या लाचारी बद्दल कविता महाजनांनी लिहिलंच आहे!
आणि हे आपण बोलतोय ते केवळ सामाजिक असहिष्णुतेमुळे होणा-या अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या संकोचा बद्दल! इतिहासात अनेक देशांमध्ये अनेक साहित्यिक/कलावंत सत्ताधा-यांकडून झालेल्या दडपशाहीशी लढलेत, तुरुंगात गेलेत, छळ सहन करत जगलेत. तशी वेळ आली तर आपले साहित्यिक काय करतील?

No comments: