एक चांगला लेख वाचला, तो प्रसिद्ध करणाऱ्यांच्या परवानगीने त्याचा अनुवाद केला आहे. परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार.
http://www.redpepper.org.uk/The-great-global-land-grab
जमिनी हडपण्याची जागतिक मोहीम
जागतिक अन्नधान्य संकटामुळे अनेक श्रीमंत देशांनी त्यांचा अन्नपुरवठा धोक्यात येऊ नये म्हणून गरीब जगातील जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली आहे. ज्या गरीब देशात हे प्रकार होत आहेत, त्यांचा स्वतःचा अन्नपुरवठा यामुळे धोक्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सू ब्रॅनफोर्ड यांच्या मते वातावरणातील बदलाला जुळवून घेण्याची आजच्या जगाची जी क्षमता आहे, तिच्या दृष्टीने हा एक टाईम बॉम्ब ठरणार आहे.
एक श्रीमंत देश आणि एक गरीब विकसनशील देश यांच्यातील मोठमोठ्या जमिनीच्या करारांच्या बातम्या ही नेहमीची घटना झाली आहे. ऑगस्ट मध्ये सौदीमधील गुंतवणूकदारांच्या एका गटाने घोषणा केली की ते आफ्रिकेमध्ये भाताच्या लागवडीसाठी 1 बिलियन डॉलर इतकी गुंतवणूक करतील. याला त्यांनी 7 X 7 X 7 असे नाव दिले आहे. कारण त्यांना 7 वर्षांमध्ये 700,000 हेक्टरमध्ये 7 दशलक्ष टन इतक्या भाताचं उत्पादन करायचं आहे. ही जमीन माली, सेनेगल आणि कदाचित सुदान आणि युगांडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये विभागलेली असेल.
काही आठवड्यांपूर्वी दक्षिण कोरियाने भात लागवडीसाठीच सुदानमध्ये 700,000 हेक्टर जमीन ताब्यात घेतली. भारत खाजगी कंपन्याच्या एका मोठ्या गटाला 350,000 हेक्टर जमीन घ्यायला आर्थिक मदत करत आहे. तीही आफ्रिकेतच असेल, पण कुठल्या देशात ते अजून नक्की नाही. दक्षिण आफ्रिकेचे काही उद्योगपती डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये 8 मिलियन हेक्टरच्या एका करारासाठी बोलणी करत आहेत. आणि हे असंच चालू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजाप्रमाणे विकसनशील जगातील कमीतकमी 30 दशलक्ष हेक्टर (साधारण 74 दशलक्ष एकर म्हणजे इंग्लंडच्या संपूर्ण भूभागापेक्षाही बरंच जास्त) इतकी जमीन फक्त या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात बाहेरच्या गुंतवणूकदारांनी खरेदी केली.
जमिनी बळकावण्याचा हा प्रकार अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटामुळे सुरू झाला. इथे गुंतवणूकदारांच्या डोक्यातल्या विचारांचा मागोवा घेणं रंजक ठरेल. कारण काय प्रकारच्या जगाकडे आपला प्रवास चालू आहे त्याबद्दल त्यातून बरंच काही समजतं. साधारण दोन वर्षांपूर्वी आर्थिक क्षेत्रातील खेळ खेळणाऱ्या अनेकांना – कामगारांचे निवृत्ती वेतन, खाजगी इक्विटी फंड, हेज फंड, मोठमोठे धान्य व्यापारी वगैरे – सब-प्राईम मॉर्टगेजचा फुगा फुटणार आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपला पैसा अधिक सुरक्षित अशा कमोडिटी (व्यापार करण्याजोगे जिन्नस) मार्केटमध्ये गुंतवला. त्यामुळे, खरं तर अचानक अन्नधान्याची टंचाई वगैरे निर्माण झाली नसूनही खाद्यान्नाचे दर (विशेषतः धान्यांचे, पण त्याचबरोबर दूध व दुधाचे पदार्थ आणि मांस यांचेही) गगनाला भिडले.
खाद्यान्नाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांना याचा चांगलाच फटका बसला कारण रोजच्या गरजेच्या अन्नाच्या स्थानिक किंमती खूप वाढल्या, विशेषतः तांदळाच्या. लोकांनी आपल्या खाण्याच्या सवयी बदलून, अनेकदा जेवण कमी करून याच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. पण त्याबरोबर सरकारने याबाबत काही करावे म्हणून ते रस्त्यावरही आले. 2008 च्या सुरुवातीला जवळजवळ 40 देशांमध्ये दंगली उसळल्या, ज्यामुळे जगभरातील राजकीय उच्चभ्रूंचे धाबे दणाणले.
घाबरलेल्या सरकारांनी त्यांची अन्नधान्याची आयात वाढवायला सुरुवात केली, ज्यामुळे अनेक अन्नधान्य उत्पादक देशांनी निर्यातीवर बंधने आणली. कारण त्यांनाही अन्नधान्याच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागेल ही भीती होतीच.
अर्थात एखाद्याला जर असं वाटेल की या संकटातून शेतकऱ्यांना लाभ झाला असेल तर तसं काही झालं नाही. त्यांना उत्पादनांचा चांगला दर मिळाला, पण त्यामुळे उत्पन्नात जी वाढ होऊ शकली असती ती मात्र वाढलेल्या उत्पादनखर्चाने खाऊन टाकली. ज्यांचा यात अतोनात फायदा झाला ते होते शेतीला लागणाऱ्या गोष्टींचे पुरवठादार. बी-बियाणे, खते, यंत्रे यावरच्या त्यांची जवळजवळ एकाधिकारशाही असल्याने या अजस्त्र कंपन्यांनी बहुतेक गरीबच असणाऱ्या जनतेकडून अधिकाधिक किंमती वसूल करत घृणा यावी इतका नफा मिळवला.
नफा कमावणाऱ्यांमध्ये त्यापुढचा क्रमांक मिळवला तो धान्याच्या व्यापाऱ्यांनी. या कंपन्यांनी आधी तर अन्नाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचे काम केले, म्हणजे मग त्यापासून नफा कमावण्याची निश्चिती झाली. कारगिलच्या, जगातील अन्नधान्याचा व्यापार करणाऱया सर्वात मोठ्या कंपनीच्या 2008 सालातल्या नफ्यात 2007 च्या तुलनेत 70 टक्के, तर 2006 च्या तुलनेत 157 टक्के इतकी वाढ झाली. ADM या अन्नधान्याच्या व्यापारातील दुसऱ्या क्रमांकावरच्या कंपनीच्या नफ्यातील वाढ 2008 मध्ये थोडी कमी होती, आणि त्याचे एक कारण इथेनॉलच्या बुडीत धंद्यातली त्यांची गुंतवणूक हे होते, पण तरीही 2006 च्या तुलनेत त्यांच्या नफ्यात 200 टक्के इतकी वाढ झाली होतीच.
परदेशात गुंतवणूक
संकट हळूहळू कमी झाले, निदान तातिपुरते तरी, पण तोपर्यंत त्याचा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नसलेल्या श्रीमंत देशांवर खोल परिणाम झाला होता. सौदी अरेबियाचंच घ्या ना. 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून हा देश काही प्रकारच्या अन्नधान्याच्या, विशेषतः गव्हाच्या बाबतीत तरी स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अन्नधान्याचे संकट येण्याच्याच काही काळ आधी सरकारने नाखुषीने हे मान्य केले, की हे धोरण फोल ठरले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पिकांना पुरेल इतके पाणीच या देशात नाही.
त्यानंतर पूर्णच मार्ग बदलून त्यांनी ठरवलं की 2015 पर्यंत, वापरल्या जाणाऱ्या अन्नातील तूट ते पूर्णतः आयातीद्वारेच पूर्ण करतील. पण यामुळे देशाचे पूर्णतः जागतिक बाजारपेठेवर अवलंबून राहू लागला. आणि त्याचवेळी ही बाजारपेठ मोठ्या प्रमाणात बेभरंवशाची होऊ लागली होती. अर्थातच घाबरलेल्या सारकारने खाजगी उद्योगपतींना सूचना दिल्या की त्यांनी बोहेरच्या देशांमध्ये कृषीउत्पादनांमध्ये गुंतवणूक करावी. पूर्व प्रभागातील आशरिका चेम्बरचे सेक्रेटरी जनरल अदनान-अल्-नईम, यांनी हे थोडक्यात एका भाषणात सांगितले: ‘या मागचा उद्देश सौदी अरेबियाकरिता दीर्घकालीन अन्नसुरक्षा आणि अन्नधान्याचा कमी आणि योग्य किंमतीत निरंतर पुरवठा मिळवून देणे हा आहे.’
चीन हे आणखी एक उदाहरण. चीन आत्ता जरी अन्नधान्याच्या बोबतीत स्वयंपूर्ण असला तरी त्यांची लोकसंख्या खूपच जास्त आहे, शेतीखालची जमीन झपाट्याने औद्योगिक विकासासाठी वापरली जात आहे आणि त्याच्या पाणीपुरवठ्याच्या क्षमतेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. चीनमध्ये जगातले 40 टक्के शेतकरी आहेत, पण शेतजमीन मात्र 9 टक्के इतकीच आहे, त्यामुळे अन्नधान्यसुरक्षा या विषयाला चिनी सरकारच्या कार्यक्रमपत्रिकेवर अग्रक्रम असण्याचे कुणालाच आश्चर्य वाटायला नको. आणि 1.8 ट्रिलियन (1.8 लाख कोटी) इतका परकीय चलनाचा साठा असल्यामुळे त्यातून स्वतःच्या अन्नधान्य सुरक्षेसाठी परदेशात गुंतवणूक करण्यासाठी चीनचे खिसे चांगले भरलेले आहेत.
दक्षिणपूर्व आशिया मधील अनेक शेतकरी नेते आणि कार्यकर्ते सांगतील की 2007 च्या जागतिक अन्नधान्य संकटाच्याही कितीतरी आधीपासून बीजिंगने आपल्या अन्नधान्य उत्पादनाचा काही भाग परदेशी आऊटसोर्स करायला सुरुवात केली आहे. चीनच्या नव्या भूराजकीय राजनैतिक कौशल्याद्वारे आणि सरकारच्या आक्रमक ‘परदेशी जा’ या बाहेर गुंतवणूक करण्याला चालना देण्याच्या धोरणामुळे गेल्या काही वर्षात 30 कृषीसहकार करारांवर शिक्कामोर्तब झाले आहे, ज्यायोगे चिनी तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी निधी यांच्या बदल्यात चिनी व्यावसायिकांना ‘मित्र देशातल्या’ जमिनींवर प्रवेश मिळतो.
दक्षिण कोरिया, इजिप्त, लिबिया, कुवेत, भारत आणि जपान यासारख्या अन्य देशांनीही त्यांच्या व्यक्तिगत कारणांसाठी हा निर्णय घेतला आहे की भविष्यातील जागतिक अन्नधान्य तुटवड्याची शक्यता लक्षात घेता काही प्रमाणात तरी खाद्यान्न पुरवठ्यासाठी त्यांच्या स्वतःच्या सीमांच्या बाहेर ज्यांच्यावर अडचणीच्या वेळी विसंबता येईल असे स्त्रोत मिळविणे शहाणपणाचे आहे. या आत्ताच्या जमिनी विकत घेण्याच्या मोहिमेमागे हे कारण आहे. याची तुलना 19 व्या शतकाच्या अखेरीस आफ्रिकेसाठी जी चढाओढ चालली होती तिच्याशी करता येईल. जगातील प्रचंड मोठे भूभाग परदेशी सत्ता काबीज करत आहेत पण आता ते लष्करी ताकद वापरत नाहीत – ते चेकबुक हलवत येतात, जे आजच्या जगामध्ये त्याहीपेक्षा जास्त शक्तिशाली शस्त्र आहे.
जरी जगातील अनेक भागांमधली जमीन ताब्यात घेतली जात आहे, तरीही सर्वात जास्त नाडला जातोय तो आफ्रिका खंड. सब-सहारन आफ्रिकेतील अनेक गरीब देशांच्या सरकारांना तातडीने मिळणाऱय् पैशांची मोह पडतो आहे. आणि परकीय गुंतवणूकदारांना हेही माहीत आहे की उद्या व्यवहारामध्ये काही गडबड झाली तरीही त्यांना बाहेर हाकलणे या ही दुर्बल सरकारांसाठी अवघड असेल. शिवाय हे परकीय गुंतवणूकदार असे होण्याची फारशी संधीही ठेवत नाहीत. बऱ्याच ठिकाणी ताब्यात घेतलेल्या जमिनी खाजगी सुरक्षा कंपन्यांच्या पहाऱ्यात आहेत अशा बातम्याही आल्या आहेत.
या नवीन घडामोडी काळजी करण्यासारख्या आहेत. जगातील काही गरीब देश त्यांच्या जनतेला खाऊ घालणारी जमीन आपल्या ताब्यातून जाऊ देत आहेत. सुदान सरकारने त्यांची 1.5 दशलक्ष हेक्टर जमीन 99 वर्षांच्या करारावर आखाती देश, इजिप्त आणि दक्षिण कोरिया यांना दिली आहे. पण सुदानला जगात सर्वात जास्त परकीय मदत मिळते. त्यांचे 5.6 दशलक्ष नागरिक बाहेरून येणाऱ्या अन्नाच्या पाकिटांवर अवलंबून आहे. मूलभूत न्यायाची सगळी तत्वं आपल्याला हेच सांगतात की सुदानने आपली जमीन आपल्या लोकांना खाऊ घालण्यायाठी वापरली पाहिजे.
या क्षणी परकीय गुंतवणूकदार याला विन-विन सिच्युएशन म्हणत आहेत, ज्यात जमीन ताब्यात घेणारे आणि ज्यांची जमीन ताब्यात घेतली जात आहे ते अशा दोघांचाही फायदा आहे. वर उल्लेखलेल्या सौदी अरेबियाच्या 7x7x7 प्रोजेक्टचे उदाहरण घेऊ. ‘पश्चिम आफ्रिकेमध्ये दरवर्षी साधारण 2 दशलक्ष टन इतक्या तांदळाचा तुटवडा पडतो.’ असे फोरास इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनीचा अहवाल सांगतो, जी या प्रकल्पातील एक भागीदार आहे. ‘आमचा प्रकल्प या अन्नतुटवड्यावर मात करण्यासाठी काम करेल, कृषीउत्पादन वाढवेल, आणि भाताच्या उत्पादनाच्या प्रमाणातही सुधारणा करेल.’ दुसऱ्या शब्दात सांगायचं तर बाहेर पाठवणे आणि स्थानिक जनतेला खाऊ घालणे या दोन्हींसाठी पुरेसा तांदूळ होईल. पण तरीही असा दिवस येऊच शकतो की अरब आणि पश्चिम आफ्रिकी या दोघांसाठी पुरेसा तांदूळ नसेल. त्यावेळी हे गुंतवणूकदार त्यांच्या स्वतःच्या खूपच जास्त श्रीमंत आणि ताकदवान तोकांना सोडून गरीब पश्चिम आफ्रिकी कुटुंबांच्या गरजांची काळजी घेतील ही कल्पनाही करणे कठीण आहे.
ज्या दिवशी अन्नधान्य संपेल...
ज्या दिवशी जगातील अन्नधान्य संपायला सुरुवात होईल तो दिवस आपल्यापैकी बहुतेकांच्या कल्पनेपेक्षा फार लवकर येणार आहे. आत्तासुद्धा, अन्नाचा तुटवडा नसतानाही एक बिलियन - एकहजार दशलक्ष लोक उपाशी असतात. अतिगरीब लोक पुरेसं खात नाहीत कारण त्यांच्याजवळ पैसे मसतात. मुळातली समस्या सामाजिक असमानता ही आहे. जगातील आर्थिक संसाधनांच्या वाटपातील प्रचंड तफावत ही आहे.
पुढच्या शतकभर आणखी भीषण अशा अन्नधान्य तुटवड्यांचा उद्रेक होत राहील. वातावरणाचे संकट शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त लवकर येऊ लागले आहे आणि खूप जास्त धेकादायक असल्याचेही दिसू लागले आहे. काही काळ अनेक शास्त्रज्ञांना असे वाटत होते की वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने त्याची उपलब्धता वाढून वनस्पतींचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे या वाढत्या प्रमाणाची काही अंशी भरपाई होईल. पण आता मात्र हे लक्षात आले आहे की हे ज्याला कार्बनचे फर्टिलायझेशन असे म्हणतात ते होणार नाही किंवा कल्पनेपेक्षा खूपच अनिश्चित असेल.
विल्यम क्लिन यांनी 2007 मध्ये सादर केलेल्या वातावरणातील बदलांचा सर्वांगीण विचार करणाऱ्या मॉडेलने हे भविष्य वर्तविले आहे की कार्बनचे फर्टिलायझेशन झाले नाही तर विकसनशील देशांमध्ये पिकांची उत्पादनक्षमता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पुढच्या 80 वर्षात 21 टक्क्याने ती कमी होईल. आणि हा अंदाजही कमीच असण्येची शक्यता आहे कारण त्यामध्ये ज्याला पॉझिटिव्ह फीडबॅक - गती वाढवणाऱ्या घटकांची निर्मिती - म्हणतात, त्यांचा परिणाम लक्षात घेतलेला नाही – जसे की आर्क्टिक आणि अंटार्क्टिकमधील बर्फाच्या लाद्या वितळणे, ग्लेशियर्स वितळणे, जंगलांमधल्या आगींच्या वारंवारतेत वाढ, पाण्याचा वाढता तुटवडा वगैरे. या गोष्टींमुळे परिस्थिती आणखी गंभीर होईल. खरोखरच, आज शेतीयोग्य जमिनीसाठी जग पालथे घालणाऱया देशांना त्यांचे शास्त्रज्ञच इशारे देतील की यापुढचे युग हे भीषण कमतरतांचे असेल.
तरीही या एकनेकांचे लचके तोडणाऱ्या जगात, या श्रीमंत देशांच्या कृतींमुळे जागतिक अन्नधान्य तुटवडा वाढणार आहे. या बाहेरच्या ताकदींनी जी जमीन हडप केली आहे त्या जमिनींवर त्यांची स्वतःची पर्यावरणीय सृष्टी आहे, जिचा वापर किमान वर्षाचा काही काळ तरी स्थानिक लोक करतात. जरी सरकारे असे म्हणत असली की ते “रिकामी” किंवा “उजाड” जमीनच विकत आहेत, तरी आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील स्थानिक समुदायांसाठी पाहिलं तर “उजाड” जमीन ही कल्पनाच चुकीची आहे.
आणि आपल्या जैववैविध्याचा नाश करून जग स्वतःच धोक्यात येत आहे. कारण विशेषतः आत्ताच्या पर्यावरणीय तणावाच्या काळात विभिन्न जाती प्रजातींनी समृद्ध अशा नैसर्गिक आणि कृषी पर्यावरण संस्थांची फार गरज आहे. आपण ज्यावर अवलंबून आहोत त्या अन्नधान्यांच्या नवनवीन जाती निर्माण करण्यासाठी आवश्यक तो कच्चा माल आणि गुणसूत्रे पुरवण्यात जैववैविध्याची भूमिका मोठी आहे. आता या अशा जातींची मोठीच गरज भासणार आहे.
मोठ्या खाजगी कंपन्यांबरोबर काम करणारे मोठे गुंतवणूकदार सध्या अस्तित्वात असलेल्या पर्यावरणसंस्थांचा नाश करत आहेत आणि रासायनिक खते आणि कीटकनाशके यावर अवलंबून असणाऱ्या एकसुरी पिकांची मोठमोठी क्षेत्रे तयार करत आहेत. पर्यावरणसंस्थांच्या नाशामुळे तिथले शेतकरी आणि गुराखी हे स्थानिक जैववैविध्याचे ज्ञान असणारे पारंपरिक समुदाय विखुरले जातात. खरे तर वातावरण बदलाशी लढण्यात हे समुदाय खूपच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
याचे एकच उदाहरण द्यायचे तर, पुरेसा निधी मिळाला तर संपूर्ण आफ्रिकाभरच्या बियांणांच्या बाजारपेठेच्या एका जाळ्यात जोडले जाऊ शकतात ज्यामुळे वातावरण बदलाबरोबर रोपांच्या जाती स्थलांतरित करण्याला मदत होऊ शकते. येऊ घातलेल्या वातावरणीय संकटांमध्ये तेच आज माणसापुढचा आशेचा किरण आहेत. आणि तरीही जमिनी हडपण्याची चाललेली प्रक्रिया त्यांच्याच पोटावर पाय आणत आहे. आणि जगभरातले आपण सगळे त्याची किंमत चुकवणार आहोत.
Friday, November 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Very good blog, albeit with only 3 posts over a long period. Please consider increasing the frequency of your postings.
Post a Comment